(रत्नागिरी)
जिल्ह्यात बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून, त्याच अनुषंगाने रत्नागिरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
या कारवाईचा भाग म्हणून बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेड उपविभागात पेट्रोलिंग करत असताना खेड-मंडणगड मार्गावर मौजे मुगीज येथे सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले.
तपासात सदर इसमाचे नाव प्रकाश राम जगताप (वय ३३ वर्षे, रा. शिरखल, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून बेकायदेशीररीत्या स्फोटक पदार्थ सदृश ७० जिवंत गावठी बॉम्ब तसेच एक चारचाकी वाहन असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयिताकडील स्फोटक पदार्थ सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याने त्यास तत्काळ ताब्यात घेण्यात आले असून, दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्फोटक पदार्थांविरोधात कठोर पावले उचलली जात असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलाने केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

