(लांजा /रत्नागिरी)
घरकामासाठी पायी निघालेल्या ६० वर्षीय महिलेला दुचाकीवरून सोडण्याच्या बहाण्याने लिफ्ट देऊन, घराच्या गेटजवळ तिच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून अज्ञात दुचाकीस्वार पसार झाल्याची घटना वेरवली बुद्रुक येथे घडली. महिलेच्या तक्रारीवरून लांजा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरिता दिनकर बाणे (६०, रा. वेरवली खुर्द, डोळेवाडी, ता. लांजा) या २९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता वेरवली बुद्रुक येथील डॉ. मुळे यांच्या घरी घरकामासाठी पायी जात होत्या. त्या वेरवली खुर्द शाळा क्रमांक १ च्या पुढील वळणावर पोहोचल्या असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले. ‘आजी, तुम्ही कुठे चालला आहात? तुम्हाला सोडतो,’ असे सांगून त्याने बाणे यांना दुचाकीवर बसवले. त्यानंतर डॉ. मुळे यांच्या घराच्या गेटपासून सुमारे १०० मीटर अंतरावर त्यांना उतरवले. बाणे पायी गेटपर्यंत गेल्या. गेट उघडून आत जात असतानाच संबंधित दुचाकीस्वार पुन्हा त्यांच्या मागे आला.
सुमारे साडेनऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ‘आजी, थांबा, तुमचा फोटो काढतो,’ असे सांगत मोबाईलचा कॅमेरा त्यांच्या चेहऱ्याजवळ आणला. फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याने बाणे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अचानक जबरदस्तीने खेचून घेतले आणि दुचाकीवरून तेथून पसार झाला. या प्रकारामुळे घाबरलेल्या बाणे यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. चोरीला गेलेले मंगळसूत्र सुमारे १५ ग्रॅम वजनाचे असून त्याची अंदाजे किंमत ९० हजार रुपये आहे. दोन पदरी असलेल्या या मंगळसूत्राला एस आकाराचे फासे, बारीक सोन्याचे तसेच काळे मणी आणि पतंगाच्या आकाराची नक्षी आहे. मध्यभागी लहान आकाराच्या दोन वाट्या आणि धण्याच्या आकाराचे चार मणी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सरिता बाणे यांच्या तक्रारीवरून लांजा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दुचाकीस्वाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, घटनास्थळाच्या परिसरातील संभाव्य हालचालींची माहिती घेतली जात आहे.


