( नवी दिल्ली/मुंबई )
मध्य पूर्वेतील तणावामुळे निर्माण झालेल्या LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारी कंपनी Oil and Natural Gas Corporation (ONGC) ने अरब सागरातील दमन अपसाइड डेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून गॅस उत्पादन सुरू केले असून, देशाच्या ऊर्जा पुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे. ONGC ने दिलेल्या माहितीनुसार, DUDP प्रकल्पांतर्गत B-12-24P प्लॅटफॉर्मवरून व्यावसायिक गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प मुंबईपासून सुमारे 180 किमी उत्तर-पश्चिम आणि गुजरातमधील पिपावावपासून 80 किमी अंतरावर स्थित असून, यासाठी सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा खर्च करण्यात आला आहे.
हाजिरा प्लांटला गॅस पुरवठा सुरू
कंपनीच्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला असून, येथून गॅस थेट हाजिरा प्लांटला पाठवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प कंत्राट मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे. ONGC ने सांगितले की, ड्रिल-डेक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रकल्पाची कार्यक्षमता वाढली आहे. या टप्प्यामुळे DUDP प्रकल्पातून गॅसचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले असून, पुढील काळात सर्व ठिकाणी उत्पादन हळूहळू वाढवले जाणार आहे.
ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा टप्पा
सध्या भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी जवळपास निम्मा वायू आयात करतो. त्यामुळे जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ONGC चा हा प्रकल्प ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. याआधी जानेवारी महिन्यात ONGC ने Reliance Industries सोबत करार केला होता. कृष्णा-गोदावरी खोरे आणि अंदमान ऑफशोअर भागात खोल समुद्रातील तेल व वायू उत्खननासाठी संसाधने सामायिक करण्याचा या कराराचा उद्देश आहे. यामुळे खर्च कमी करणे, कामाचा वेग वाढवणे आणि संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करणे शक्य होणार आहे.
मध्य पूर्वेतील तणावामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या काळात देशांतर्गत गॅस उत्पादन सुरू होणे ही अत्यंत सकारात्मक बाब मानली जात आहे. यामुळे LPG आणि नैसर्गिक वायू पुरवठा साखळी अधिक स्थिर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

