(नवी दिल्ली)
भारताच्या सांस्कृतिक इतिहासात एक मोठी भर पडली आहे. दिवाळी (Diwali) या प्रकाशोत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (UNESCO Intangible Cultural Heritage – ICH) यादीत समावेश झाला आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आयसीएचच्या २०व्या सत्रात ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ८ डिसेंबरपासून लाल किल्ल्यावर सुरू झालेलं हे जागतिक सत्र १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचं स्वागत करताना X वरील पोस्टमध्ये लिहिलं, “दिवाळी हा सण भारतीय संस्कृती, नीतिमत्ता आणि अध्यात्माशी घट्ट जोडलेला आहे. युनेस्कोच्या यादीतील समावेशामुळे या उत्सवाची जागतिक ओळख आणि लोकप्रियता अधिक दृढ होईल. दिवाळी हा प्रकाश, धर्मनिष्ठा आणि प्रभु श्रीरामांच्या आदर्शांचा शाश्वत संदेश आहे.”
दिल्लीचे कला, संस्कृती, भाषा व पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी हा क्षण “भारतासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा” असल्याचं सांगितलं. “दिवाळी”च्या जागतिक मान्यतेनंतर दिल्ली हाटमध्ये भव्य दिवाळी उत्सव आयोजित करण्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारताच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक विविधतेला मिळालेल्या या जागतिक मान्यतेचं त्यांनी विशेष कौतुक केलं.
आयसीएच सत्राच्या उद्घाटनावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, युनेस्कोचे महासंचालक खालिद एल अनानी आणि भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा उपस्थित होते.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं, “दिल्ली हे केवळ शहर नाही, तर भारताच्या ३,००० वर्षांच्या सातत्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचं जिवंत प्रतीक आहे. वेद-उपनिषदांपासून ते योग, वैदिक जप, सण, विधी आणि लोककला भारताचा अमूर्त वारसा लोकांच्या जीवनशैलीत रुजलेला आहे.”
दिवाळीच्या जागतिक गौरवानंतर दिल्लीमध्ये विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
– लाल किल्ल्यावर भव्य दिवाळी उत्सव
– सामूहिक दिवाळी समारंभ
– प्रमुख रस्ते, चौक आणि सरकारी इमारतींवर आकर्षक रोषणाई
कपिल मिश्रा म्हणाले, “दिवाळी हा केवळ उत्सव नाही तर अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा शाश्वत विजय आहे.”
सध्या भारताचे १५ सांस्कृतिक घटक युनेस्कोच्या अमूर्त वारशात नोंदलेले आहेत, ज्यात कुंभमेळा, दुर्गा पूजा, गरबा, योग, वैदिक जप, रामलीला यांचा समावेश आहे. “दिवाळी”चा समावेश झाल्यानंतर भारताची जागतिक सांस्कृतिक प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.

