(मुंबई)
ज्येष्ठ समाजवादी नेते, कणकवली-मालवणचे माजी आमदार आणि ‘गरीबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. यशवंतराव बाबाजी दळवी, उर्फ य. बा. यांचं रविवारी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी आपल्या जीवनाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांचा जीवनप्रवास हा समाजसेवेचा आदर्श ठरला आहे. कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते.
डॉ. य. बा. दळवी यांनी 1953 साली वैद्यकीय पदवी मिळवली. त्यांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळू शकली असती, मात्र त्यांनी आपल्या गावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुली येथे जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तब्बल सहा दशके सातत्याने, अडचणीत सापडलेल्या रुग्णांची सेवा केली. विशेषतः कोरोना काळात आजारी पडण्यापर्यंत त्यांनी रुग्णसेवा सुरूच ठेवली होती.
रुग्णांवर उपचार करण्यासाठी ते मध्यरात्रीसुद्धा चार-पाच मैलांचे अंतर पायी किंवा सायकलवर जाऊन पोहोचत असत. सर्पदंश, बाळंतपण, आपत्कालीन परिस्थिती यांत त्यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिलं. त्यामुळे ते कळसुली परिसरात ‘आमचे डॉक्टर’ या नावाने लोकप्रिय झाले. डॉ. दळवी यांनी केवळ वैद्यकीयच नव्हे, तर सामाजिक कार्यातही आपलं योगदान दिलं. भूदान आणि श्रमदानाच्या माध्यमातून त्यांनी गावासाठी हायस्कूलची उभारणी केली, तसेच ओसरगाव–कळसुली आणि कणकवली–हळवल–शिरवल मार्गे रस्ते तयार केले.
राजकीय क्षेत्रात त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावरून 1962 साली कणकवली मतदारसंघातून आमदारकी मिळवली. पुढे 1978 मध्ये मालवण मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर विधानसभेत निवडून आले. बॅरिस्टर नाथ पै आणि माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी होते.
‘आपले हे हात रुग्णांच्या सेवेसाठी आहेत, ते आता जरी थकले असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत राहावी असे वाटते. मला दोनवेळा आमदारकी मिळाली, पण त्यात मी रमलो नाही. मंत्री खोटी उत्तरे देतात त्याची मला चीड यायची, ते ऐकावेसे वाटत नव्हते. माझ्या कोकणातील कार्यकर्ते नेक होते, रद्दीवर झोपत आणि उपाशीपोटी काम करत. त्यांच्यासाठी, समाजासाठी मी काही करू शकणार नाही अशी माझी पक्की खात्री झाली आणि म्हणूनच आपण वैद्यकीय सेवा करण्याला महत्व दिले. राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे, तसे झाले तर देशाचे भले होईल .आपण अनेक रूग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढू शकलो ते केवळ दैवी पाठबळामुळेच असे डॉ.य.बा. दळवी सांगत नेहमी असायचे.
त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. साधना दळवी, सुपुत्र रणजीत (क्रीडा पत्रकार), कन्या कल्पना कदम, दीया मोरे, सुप्रिया सुलचंदानी, तसेच नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा नातू अनिरुद्ध सध्या वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

