(डोडा / जम्मू-काश्मीर)
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी एक भीषण लष्करी अपघात घडला. भारतीय लष्कराचे ‘कॅस्पर’ (माईन प्रोटेक्टेड आर्मर्ड व्हेईकल) सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने ११ जवान शहीद झाले असून १० जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघातावेळी वाहनात एकूण २१ जवान प्रवास करत होते.
उपलब्ध माहितीनुसार, हे लष्करी वाहन डोडा जिल्ह्यातील भद्रवाह–चंबा रोडवरून जात होते. जवान उंच पर्वतीय भागातील एका सुरक्षात्मक पोस्टकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन खोल दरीत कोसळले. हा मार्ग डोंगराळ व वळणावळणाचा असल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली.
घटनेची माहिती मिळताच लष्कर, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन मदत पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दरीत कोसळलेल्या वाहनातून जवानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात आले. जखमी जवानांना घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी उधमपूर येथे विमानाने हलवण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तीन जवानांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
अपघाताच्या कारणांचा तपास सुरू
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून सखोल तपास सुरू असून, रस्त्याची अवस्था, वाहनाची तांत्रिक स्थिती आणि हवामान यासह सर्व संभाव्य बाबींची चौकशी व माहिती घेतली जात आहे.
डोडा जिल्ह्यातील सुरक्षेची पार्श्वभूमी
डोडा जिल्हा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या या भागात दहशतवादी हालचालींची शक्यता कायम असते. गुप्तचर अहवालांनुसार, डोडा आणि शेजारच्या किश्तवार जिल्ह्यात ३० ते ३५ पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात भारतीय लष्कराची सातत्याने गस्त आणि हालचाल सुरू असते.

