(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल पंचक्रोशीतील नागरिकांच्या शासकीय कामकाजाची सोय, वेळ आणि आर्थिक बचत लक्षात घेता पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे अत्यावश्यक आहे, असे मत पाचलचे सरपंच बाबालाल उमर फरास यांनी व्यक्त केले.
फरास म्हणाले की, गेल्या चार दशकांपासून पाचल तालुका निर्मिती समिती या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पाचल हे पंचक्रोशीतील प्रमुख व्यापारी, शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित झाले असून परिसरातील नागरिक बँकिंग, खरेदी-विक्री, रोजगार, प्रवास तसेच विविध शासकीय आणि दैनंदिन कामांसाठी पाचललाच येतात.
पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील शिक्षणाची सुविधा पाचलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय संगणक प्रशिक्षण केंद्रे, बँका, पोस्ट कार्यालय, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, पतसंस्था, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, एसटी बस सेवा, वडाप आणि रिक्षा सेवा अशा विविध सुविधा येथे उपलब्ध असल्याने पाचल हे परिसराचे प्रमुख केंद्र बनले आहे.
पाचलचा साप्ताहिक बाजार हा पंचक्रोशीतील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराचा महत्त्वाचा भाग असून बाजारासोबतच इतर अनेक कामेही याच ठिकाणी पूर्ण होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो.
सरपंच फरास यांनी पुढे सांगितले की, पंचक्रोशीतील अनेक शासकीय बैठका, ग्रामसभांसह विविध कार्यक्रम पाचल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केले जातात. सध्या मंडळ अधिकारी कार्यालय आणि दोन तलाठी कार्यालयांसाठी ग्रामपंचायतीची जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठीही ग्रामपंचायतीतील प्रशस्त सभागृह, स्वतंत्र खोल्या आणि आवश्यक जागा विनामूल्य देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
“अप्पर तहसील कार्यालय हा विषय पाचल आणि रायपाटण असा नसून पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीचा आहे. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा, दळणवळण, शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यवस्था सक्षम आहे, त्या पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू झाल्यास संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांना त्याचा मोठा लाभ होईल,” असेही सरपंच बाबालाल फरास यांनी स्पष्ट केले.

