(आंध्र प्रदेश)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी प्रसिद्ध तिरुपती वेंकटेश्वर मंदिराच्या लाडू (प्रसाद) मध्ये भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा गंभीर आरोप माजी सरकारवर केला आहे. नायडूंच्या मते, हे तूप अगदी बाथरूम क्लिनरमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांपासून तयार केले गेले होते, ज्यामुळे मंदिराची पवित्रता धोक्यात होती. मुख्यमंत्री नायडू यांनी वायएसआरसीपीवर प्रसादात भेसळ करून श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे
नायडू हे कुर्नूल जिल्ह्यातील येम्मिगनूर येथे शेतकऱ्यांना जमिनीच्या पासबुक वाटप कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी मागील YSRCP सरकारवर कडाडून टीका करत म्हटले, “गेल्या पाच वर्षांत श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराची पवित्रता नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. प्रसादासाठी वापरले जाणारे तूप रासायनिक प्रक्रियेतून बनवले गेले, त्यात बाथरूम क्लिनरसारख्या घटकांचा समावेश होता.” चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे की, जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिराचे लाडू बाथरूम क्लिनर केमिकल्सने भरलेल्या तुपापासून बनवले जात होते.
माजी टीटीडी अध्यक्षांनी कबुली दिली
नायडू म्हणाले की, TTD (तिरुमला तिरुपती देवस्थानम) च्या माजी अध्यक्षांनीही या भेसळीबाबत कबुली दिली होती. सत्तेत आल्यापासून त्यांच्या सरकारने त्वरित पावले उचलली असून, आताच्या लाडूंची चव आणि गुणवत्ता पूर्णपणे शुद्ध आणि सुरक्षित आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींवर जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. “शेतकऱ्यांच्या पासबुकवर स्वतःचे फोटो छापण्याचा अधिकार त्यांना कोण दिला? या कामासाठी जनतेचे ७०० कोटी रुपये खर्च झाले,” असे त्यांनी म्हटले.
शेतकऱ्यांसाठी नवीन पासबुक मोहीम
जमिनीसंबंधी गैरव्यवहार रोखण्यासाठी तेलुगू देशम पक्षाचे सरकार सुरक्षा फीचर्ससह नवीन पासबुक जारी करीत आहे. एप्रिलपर्यंत १८ लाख शेतकऱ्यांना ही पुस्तके वाटप करण्याचे उद्दिष्ट असून, जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्यांना कठोर कारवाई आणि तुरुंगाचा इशारा दिला आहे.

