(अलिबाग)
राज्यात सध्या बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रामुख्याने ग्रामीण भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. सोशल मीडियावर बिबट्याच्या नव्या व्हिडिओंबाबत सतत चर्चा सुरू आहे. अशातच अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नागाव गाव बिबट्याच्या मुक्त वावरामुळे भयभीत झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
नागाव परिसरात काल दुपारी अचानक बिबट्या दिसल्याने गावात एकच खळबळ उडाली. हा बिबट्या दिवसाढवळ्या वाड्यांमध्ये फिरताना दिसला. त्याने तब्बल पाच जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमींमध्ये प्रसाद सुतार, कुणाल साळुंखे, अमित वर्तक, मंदार गडकरी आणि भाऊसाहेब जवरे यांचा समावेश आहे. सर्वांना तातडीने रायगड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा मुक्त वावर पाहता नागावमधील सर्व शाळांना तात्पुरत्या सुट्या देण्यात आल्या आहेत.
बिबट्याच्या हालचालींची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याचा मागोवा घेत सर्व माहिती पडताळण्यात आली असून टीम सतत गस्त ठेवत आहे. बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्याचे काम सुरू असल्याचे रेस्क्यू टीमने सांगितले.
दरम्यान, २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत अलिबागमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र नागावमध्ये सुरू असलेल्या बिबट्याच्या हालचालींमुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

