(मुंबई / वृत्तसंस्था)
मृत्यू दाखला म्हणजेच डेथ सर्टिफिकेट (Death Certificate) मिळवण्याच्या प्रक्रियेत १ ऑक्टोबरपासून महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. मृत्यूच्या नोंदणीला होणारा विलंब आणि त्यातील गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने नियम अधिक कडक केले आहेत. ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा, 2026’ (Registration of Births and Deaths Amendment Act, 2026) अंतर्गत ही नवीन नियमावली लागू केली जाणार आहे. त्यामुळे मृत्यूची नोंद वेळेत करणे नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार असून, विलंब झाल्यास त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी घेणे आवश्यक असेल.
नवीन नियमांनुसार मृत्यूच्या नोंदणीला जितका अधिक विलंब होईल, तितकी मंजुरीची प्रक्रिया अधिक कठीण होणार आहे. मृत्यूच्या तारखेपासून १ वर्षापेक्षा जास्त, मात्र २ वर्षांच्या आत नोंदणी करायची असल्यास जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate), उपविभागीय दंडाधिकारी (SDM) किंवा कार्यकारी दंडाधिकारी (Executive Magistrate) यांचा लिखित आदेश आवश्यक असेल.
मृत्यू होऊन २ वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला असल्यास प्रथम श्रेणी न्यायालयीन दंडाधिकारी (Judicial Magistrate First Class) यांच्या आदेशानंतरच मृत्यूची नोंदणी करता येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी घटनेची सत्यता तसेच सादर करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी करतील. त्यानंतरच डेथ सर्टिफिकेट जारी केले जाईल.
मृत्यूची नोंदणी मृत्यू ज्या क्षेत्रात झाला आहे, त्या क्षेत्रातील संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडे करावी लागते. या प्राधिकरणामध्ये नगरपरिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा संबंधित स्थानिक संस्था यांचा समावेश होतो. अनेक राज्यांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डेथ सर्टिफिकेटसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.
रुग्णालयात मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णालयाकडून मृत्यूच्या कारणाचा वैद्यकीय दाखला (Medical Certificate) दिला जातो. डेथ सर्टिफिकेटसाठी अर्ज करताना रुग्णालय किंवा डॉक्टरांनी दिलेला मृत्यूचा किंवा मृत्यूच्या कारणाचा दाखला सादर करावा लागतो. याशिवाय मृत व्यक्तीचे नाव, जन्मतारीख आणि जन्मठिकाण दर्शवणारा पुरावाही आवश्यक असतो.
माहिती देणाऱ्या अर्जदाराचे ओळखपत्र, जसे की आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, अर्जासोबत द्यावे लागते. त्याचबरोबर रुग्णालयाचे डिस्चार्ज किंवा संबंधित वैद्यकीय कागदपत्रे आणि विहीत नमुन्यातील भरलेला अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


