(मुंबई)
राज्य सरकारने सलग दुसऱ्या दिवशी मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची ही अलिकडच्या काळातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच 10 ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्यानंतर आता पुन्हा मोठा निर्णय घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या फेरबदलात छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले असून, काही महापालिकांमध्ये नव्या आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा या बदल्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील कामकाज गतीमान करण्यासाठी हा मोठा फेरबदल करण्यात आल्याची चर्चा प्रशासनात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. विशेषतः कॅबिनेट बैठकीच्या आसपास आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची पद्धत पाहायला मिळत आहे. या आठवड्यातच दोन वेळा मोठ्या प्रमाणावर बदल्यांचे आदेश जारी करण्यात आल्याने प्रशासनात चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासनिक कामकाजावर काय परिणाम होतो, तसेच नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा कशा पूर्ण केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदली सविस्तर यादी
1. जी. श्रीकांत : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जी. श्रीकांत यांची आता नवी मुंबईतील जल जीवन मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2. दिलीप स्वामी : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी झाली आहे.
3. वर्षा ठाकूर-घुगे : लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
4. दीपक सिंगला : पीएमआरडीए, पुणे येथील अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची नागपूर येथील मनरेगा आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
5. के. मंजुलक्ष्मी : कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे येथील पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
6. डॉ. राजेंद्र भारूड : मुंबईतील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारूड यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
7. डॉ. प्रवीणकुमार देवरे : पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
8. डॉ. भरत बास्टेवाड : नागपूर येथील मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांची लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
9. वर्षा लड्डा : पुणे येथील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा यांची अमरावती महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अमोल येडगे : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्त पदी बदली झाली आहे.
11. डॉ. विजय राठोड : एमआयडीसी, मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. विनय गौडा जी.सी. : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
13. डॉ. किरण पाटील : बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
14. डॉ. मंगेश गोंदावले : एमआयडीसी, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.
15. कुमार आशीर्वाद : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे.
16. वसुमना पंत : नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
17. प्रजित नायर : गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली आहे.
18. अंकित : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
19. कार्तिकेयन एस. : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
20. संजीता महापात्रा : अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
21. मिन्नू पी. एम. : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.
22. सत्यम गांधी : सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
23. जस्मिन : रत्नागिरीतील राजापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी जस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.
24. अंजली शर्मा : अंजली शर्मा यांची जालना महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
25. कृष्णकांत कनवारिया : नंदुरबारमधील शहाद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

