(मुंबई)
अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला असून, तब्बल 1 लाख 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांत रबी पिके, कांदा, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बीडमध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
पुणे शहरात गुरुवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर भरदिवसा अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांत वादळी वाऱ्यासह पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. आंबा आणि डाळिंब फळबागांनाही मोठा फटका बसला.
जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. वाशिममध्ये बिजवाई कांद्याचे नुकसान झाले, तर नागपूर जिल्ह्यात मध्यरात्रीच्या पावसामुळे रबी पिके आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि साक्री तालुक्यांत गारपीट झाली, तर भंडारा जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे फळभाज्या, पालेभाज्या आणि कलिंगड पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यभरातील नुकसानीचा आढावा घेत तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले.
20 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे सुमारे 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कापणीच्या उंबरठ्यावर आलेली पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, तातडीने आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.

