(पुणे)
पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, दरडी कोसळणे, भिंती कोसळणे आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याच्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले असून जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. तर पावसामुळे पुण्यात झाडपडीच्या ५१ घटना समोर आल्या आहेत.
मावळमध्ये घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर गेल्या दोन दिवसांत अधिक वाढला. काही भागांमध्ये 200 ते 250 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बचाव पथकांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
पिंपरी-चिंचवडमध्ये भिंत कोसळली, खेडमध्ये एकाचा मृत्यू
रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये भिंत कोसळल्याने दहा जण जखमी झाले. त्यापैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर खेड तालुक्यात पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा पाचवर पोहोचला असून 20 जण जखमी झाले आहेत.
मुंबई-पुणे मार्गावरील मिसिंग लिंकवर दरड
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळही दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्या 90 टक्के साफसफाईचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
घाटमाथ्यावर रेड अलर्ट; वारकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन
भारतीय हवामान विभागाने मंगळवारी घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, 7 आणि 8 जुलै रोजी अनुक्रमे देहू आणि आळंदी येथून श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून किंवा त्यापुढील टप्प्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
इंद्रायणी नदीला पूर; वारकऱ्यांसाठी 101 शाळांमध्ये निवास व्यवस्था
इंद्रायणी नदीला पूर आल्याने परिसरातील सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची पुण्यातच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, वारकऱ्यांनी सध्या आळंदीकडे न जाता पुण्यातच थांबावे. त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या 101 शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांना 12 जुलैपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली असून शहरातील नियोजित पाणीकपातही रद्द करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले की, पुणे शहरातील शाळा नियमित सुरू राहतील. मात्र घाटमाथा परिसरातील शाळांना रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुटी देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा कायम ठेवला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोठ्या झाडांच्या खाली किंवा जीर्ण इमारतींच्या परिसरात वाहने उभी करू नयेत तसेच अशा ठिकाणी थांबणे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

