(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यात देवरूख पोलिसांनी शिकारीच्या उद्देशाने बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पांगरी-घोडवली सीमेवर बुधवारी पहाटे गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून विनापरवाना बंदूक आणि ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
माहितीनुसार, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक पहाटेच्या सुमारास परिसरात गस्त घालत होते. यावेळी पांगरी-घोडवली सीमेवर मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करत असलेले दोन तरुण पोलिसांच्या नजरेस पडले. सचिन कामेरकर, सचिन पवार आणि अभिषेक वेळवणकर यांनी तत्काळ त्यांना अडवून चौकशी केली. तपासादरम्यान संबंधितांकडून विनापरवाना बंदूक आढळून आली. प्राथमिक चौकशीत वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने ते फिरत असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी सूरज आगरे (रा. आग्रेवाडी, तुळसणी) आणि संदीप कातकर (रा. कातकरवाडी, तुळसणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक बंदूक, ७ जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
या कारवाईबद्दल लांजा विभागाचे पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी देवरूख पोलिसांचे कौतुक केले आहे. जप्त केलेली बंदूक आरोपींकडे कशी आली आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचे संबंध आहेत का, याचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरात वाढत्या शिकारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक तीव्र करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

