(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे उष्म्यात लक्षणीय वाढ झाली असून त्याचा परिणाम नागरिकांसह कृषी क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने हवेत कमालीची दमटता वाढली आहे आणि त्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत.
यंदाच्या हंगामात आधीच आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला असून सुमारे ८० टक्के पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत उरलेल्या २० टक्के पिकावरही बदलत्या हवामानाचे सावट गडद होत चालल्याने उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ढगाळ हवामान, दमट वातावरण आणि अधूनमधून वाढणारी उष्णता यामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंबा उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असली, तरी रत्नागिरी शहर परिसरात अद्याप पावसाची नोंद झालेली नाही. मात्र, दिवसभर ढगांचे आच्छादन आणि संध्याकाळी बदलणारा हवामानाचा स्वरूप यामुळे वातावरण अधिक चिकट आणि अस्वस्थ बनत आहे.
स्थानिक बाजारपेठांमध्ये अद्याप आंब्याची आवक अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. उत्पादन घटल्याने बाजारात अपेक्षित प्रमाणात फळ उपलब्ध नसल्याने ग्राहकांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे. आंबा शेतकरी मात्र उरलेले उत्पादन सुरक्षित राहावे यासाठी हवामान स्थिर होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

