(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील राजनगर परिसरात भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीमुळे एका युवतीला दुखापत झाल्याची घटना समोर आली असून, परवान्याविना वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कोकणनगर ते चर्मालय मार्गावर राजनगर येथील बँक ऑफ इंडिया एटीएम समोर हा अपघात घडला. संशयित आरोपी पूजा प्रथमेश सोगम (वय ३२, रा. साई मंदिरजवळ, विनम्रनगर गोडावून स्टॉप, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील होंडा ट्विस्टर ही दुचाकी वाहन चालविण्याचा वैध परवाना नसताना चालवत होता. तपासात असे समोर आले की, संबंधित दुचाकी पुढील व मागील क्रमांकफलकांशिवाय तसेच विमा नसताना रस्त्यावर आणण्यात आली होती. भरधाव वेगात आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवित असताना संशयित आरोपीने राँग साईड घेत चर्मालयकडून येणाऱ्या टीव्हीएस ज्युपिटरला धडक दिली. या अपघातात रक्षा राजेश पुनसकर (वय १९, रा. प्लॉट नं. ३०, कोकणनगर) या युवतीला दुखापत झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून जखमी युवतीवर उपचार करण्यात आले.
या प्रकरणी फिर्यादी शरद बाबल्या कांबळे (पोहेकॉ/४२८, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, ३(१)/१८१, १४६/१९६ आणि ५०/१७७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उघड उल्लंघन आणि निष्काळजी वाहनचालना यामुळे शहरातील रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.

