(मुंबई / प्रतिनिधी)
मराठी चित्रपट, साहित्य, अभिनय आणि चित्रपटनिर्मितीच्या विविध पैलूंचा वेध घेणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवात दुसऱ्या दिवशीही सिनेरसिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात १५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या महोत्सवात सोमवारी १२ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, दोन परिसंवाद, दोन कार्यशाळा आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यासोबतच मराठी साहित्यकृतींना चित्रपट आणि वेबमालिकांच्या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘पुस्तक ते सिनेमा’ या उपक्रमालाही महत्त्व देण्यात आले.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात सोमवारी सकाळी ‘पुस्तक ते सिनेमा’ या उपक्रमातून साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील परस्परसंबंध अधोरेखित करण्यात आले. चित्रपट किंवा वेबमालिकांमध्ये रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या प्रकाशित मराठी पुस्तकांच्या लेखकांना आपल्या साहित्यकृती थेट चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकारांसमोर मांडण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली.
महोत्सवाच्या ज्ञानवर्धक उपक्रमांमध्ये ‘अथातो सिनेजिज्ञासा’ आणि ‘स्वर-नाद-निनाद’ या दोन कार्यशाळांचा समावेश होता. ‘अथातो सिनेजिज्ञासा’मध्ये सिनेअभ्यासक मिलिंद दामले यांनी सिनेमाचे माध्यम, त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये यांची माहिती दिली. तर प्रसिद्ध ध्वनीसंकलक मंदार कमलापूरकर यांनी ‘स्वर-नाद-निनाद’ कार्यशाळेतून चित्रपटातील ध्वनी आणि संगीत संयोजनाची ओळख करून दिली.
चित्रपटसृष्टीतील अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणाऱ्या दोन परिसंवादांनाही उपस्थितांचा प्रतिसाद मिळाला. ‘गावकुसातला मराठी सिनेमा’ या विषयावरील परिसंवादात दिग्दर्शक हरीश इथापे, मंगेश बदर, रावबा गजमल, शेखर रणखांबे आणि विजय कळमकर यांनी आपले अनुभव मांडले. अभिनेत्री म्हणून घडलेला प्रवास आणि कारकीर्दीतील विविध अनुभव यांवर ‘तिचं नायिका होणं!’ या परिसंवादात अभिनेत्री वर्षा उसगांवकर, छाया कदम आणि सायली संजीव यांच्याशी संवाद साधण्यात आला.
दिवसभरातील चित्रपट प्रदर्शनांमध्येही आशय आणि शैलीचे वैविध्य पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रात ‘घरत गणपती’, ‘श्री गणेशा’ आणि ‘गारूड’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. दुपारच्या सत्रात अभिजात मराठी चित्रपट ‘सांगत्ये ऐका’ यासह ‘सांगळा’ आणि ‘नवरदेव बीएस्सी अॅग्री’ हे चित्रपट दाखवण्यात आले. त्यानंतरच्या सत्रात ‘स्नो फ्लॉवर’, ‘जारण’ आणि ‘फुलवंती’ या चित्रपटांचे प्रदर्शन झाले. सायंकाळच्या सत्रात ‘दशावतार’, ‘श्यामची आई’ आणि ‘सिनेमॅन’ हे चित्रपट रसिकांसाठी सादर करण्यात आले. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची उदंड उपस्थिती लाभली. वेगवेगळे विषय, मांडणी आणि चित्रपट शैली यांमधून मराठी चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलतेचे विविध पैलू अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.
दरम्यान, ‘हाच माझा मार्ग…’ या विशेष सत्रात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची मुलाखत घेण्यात आली. वरिष्ठ सिनेपत्रकार अमित भंडारी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बालकलाकार म्हणून सुरू झालेली कारकीर्द ते नायकापर्यंतचा प्रवास, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभव, दिग्दर्शनाची वाटचाल, चित्रपट निर्मितीतील अनुभव तसेच सिनेक्षेत्रात झालेले बदल अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. सचिन पिळगांवकर यांनी आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासातील अनुभव आणि विविध पैलू प्रांजळपणे मांडले. त्यांच्या कारकिर्दीविषयी आणि चित्रपटसृष्टीतील अनुभवांविषयी जाणून घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली.
चित्रपट प्रदर्शनासोबतच साहित्य, अभिनय, दिग्दर्शन, ध्वनी आणि संगीत अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे. या उपक्रमांमुळे ‘चित्रपताका’च्या दुसऱ्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून सिनेरसिक, चित्रपटकर्मी आणि माध्यम प्रतिनिधींकडून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही चित्रपटप्रेमींसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. ‘लग्नकल्लोळ’, ‘कुर्ला टु वेंगुर्ला’, ‘आता थांबायचं नाय!’, ‘देऊळबंद २’, ‘उत्तर’, ‘पिंजरा’, ‘तिघी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘तू मी आणि अमायरा’, ‘मॅगझिन’, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ आणि ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या १२ चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.
याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि दिग्दर्शक ओम राऊत यांच्या विशेष मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अॅडगुरूंचा सल्ला’, ‘आजचा मराठी सिनेमा’ आणि ‘मराठी सिनेमा पैलतिरावरून’ या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. तसेच नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर यांची ‘नृत्याची भाषा’ आणि उमेश कुलकर्णी यांची ‘जागतिक क्षितिजावर मराठी सिनेमा’ या विषयांवरील कार्यशाळाही मंगळवारी महोत्सवात आयोजित करण्यात आल्या आहेत.


