(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत आज पुरवठा विभागाने धडक कारवाई करत ‘सद्गुरु गॅस सेवा’ या नावाने सुरू पाचल येथील असलेल्या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकल्याने गैरप्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानातून ग्राहकांचे गॅस कार्ड जमा करून त्यावर सिलेंडर बुकिंग करण्यात येत होते. त्यानंतर हे सिलेंडर चढ्या दराने विकले जात असल्याचा आरोप आहे. काही ग्राहकांच्या नावावर सिलेंडर उचलूनही प्रत्यक्षात त्यांना गॅस न देण्यात आल्यामुळे हा प्रकार उघड झाला.
सध्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाचल परिसरात काळाबाजार वाढल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राजापूर पुरवठा विभागाने तपासणी केली असता, दुकानात एक कमर्शियल भारत गॅस सिलेंडर तसेच तब्बल १०९४ ग्राहकांची गॅस पुस्तिका (कार्ड) आढळून आली. ही सर्व पुस्तिका व सिलेंडर दि. १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता जप्त करून राजापूर पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
याबाबत संबंधित सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास भिकू कोलते (रा. रायपाटण, ता. राजापूर) यांच्याशी संपर्क साधला असता, “आम्ही गेली ४० वर्षे सेवा देत आहोत. ग्राहक स्वतःहून आपली गॅस पुस्तिका आमच्याकडे ठेवून जातात,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रत्नागिरी व परिसरातील विविध गॅस एजन्सींशी संबंधित कनेक्शनचे ट्रान्सफर, बुकिंग प्रक्रिया आणि कार्ड वापराबाबतही अधिक तपास सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
या कारवाईवेळी राजापूर पुरवठा निरीक्षक निलेश लाड, पाचल मंडळ अधिकारी सौ.पूनम गावित, तलाठी नरके, पाचल पेठवाडीचे तलाठी श्री.शशिकांत कांबळे, पुरवठा लिपिक विक्रम पाटील, ग्रामवसूल अधिकारी कृष्णा गोरड, कोतवाल अमित चिले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे तसेच पत्रकार तुषार पाचलकर उपस्थित होते.
या प्रकरणामुळे पाचल परिसरात खळबळ उडाली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

