(राजापूर / तुषार पाचलकर)
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी सहाय्यक शिक्षक गौतम पांगरीकर यांनी विद्यार्थ्यांना ताण-तणावाची कारणे, त्याचे परिणाम आणि त्यावर मात करण्यासाठी उपयुक्त उपायांची सविस्तर माहिती दिली.
आजच्या स्पर्धात्मक युगात अभ्यास, परीक्षा आणि विविध अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत ताणाचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असल्याचे गौतम पांगरीकर यांनी सांगितले. वेळेचे योग्य नियोजन, नियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारसरणी यांचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास ताणाचा सामना करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अपयशामुळे निराश न होता आत्मविश्वासाने पुढे जाणे आणि अडचणींच्या वेळी पालक व शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. सकारात्मक विचार, संयम आणि आत्मविश्वास ही ताणमुक्त जीवनाची गुरुकिल्ली असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश या मार्गदर्शनातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुंभार, सहाय्यक शिक्षक सिद्धांत सरफरे, सरिता कुरणे, शिक्षकेतर कर्मचारी सुरेश कांबळे तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच मानसिक स्वास्थ्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.


