(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रामीण भागातील अनेक शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंद होण्याच्या उंबरठ्यावर असताना राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, बौद्धवाडीने यंदा एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पहिलीच्या वर्गात तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने शाळेने विक्रमी नोंद केली असून परिसरात या यशाची चर्चा रंगली आहे.
पाचल परिसरातील जिल्हा परिषदांच्या सहा शाळांपैकी बौद्धवाडी येथील ही शाळा विद्यार्थी व पालकांचा वाढता विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहे. यावर्षी पहिलीत २५ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्याने शाळेची एकूण पटसंख्या ८७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ही पटसंख्या ७४ होती. एका वर्षात झालेली ही वाढ शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची पावती मानली जात आहे.
शाळेचा प्रारंभ २ जुलै २००१ रोजी वस्तीशाळा म्हणून ग्रामपंचायत पाचलच्या माध्यमातून झाला. सुरुवातीला अवघे १० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत होते. २००८-०९ पर्यंत एकाच शिक्षकाच्या बळावर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरू होते. त्या काळात शिक्षक जयराज पांगरीकर यांनी एकहाती शाळेची धुरा सांभाळली.
सन २००८-०९ मध्ये जिल्हा परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर शाळेच्या विकासाला गती मिळाली. सध्या शाळेत मुख्याध्यापिका सौ. सीमा कोलते, शिक्षक श्री. जयराज पांगरीकर आणि श्री. अरुण हिरवे असे तीन शिक्षक कार्यरत आहेत.
शाळेत केवळ नियमित शिक्षणावरच नव्हे, तर स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांवरही विशेष भर दिला जातो. याच प्रयत्नांमुळे शाळेने तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर अनेक यश संपादन केले आहे.
क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी खो-खो आणि कबड्डी स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय निवड मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. तसेच २०२४-२५ आणि २०२५-२६ या सलग दोन वर्षांत मंथन व सिंधुरत्न स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे.
आरएसएम परीक्षेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून इयत्ता पहिलीतील दोन विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर सुवर्णपदक, तर इयत्ता तिसरीतील दोन विद्यार्थ्यांनी कांस्यपदकासाठी पात्रता मिळवली आहे.
शाळेच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य असल्याचे मुख्याध्यापिका सौ. सीमा कोलते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांमुळेच पालकांचा शाळेकडे ओढा वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

