(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर भागात घरगुती गॅस वितरणावरून ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत HP गॅसच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहक मेटाकुटीस आले असून, रीतसर बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने संतापलेल्या ग्राहकांनी आता सामूहिकरीत्या कनेक्शन रद्द करून भारत गॅसकडे वळण्याचा पवित्रा घेतला असल्याचे चित्र आहे. या संदर्भात जिल्हा व पुरवठा विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्याची तयारीही ग्राहकांनी केली असल्याचे समजते.
संगमेश्वर भागात गॅस वितरणाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नियमानुसार गॅस बुकिंग केल्यानंतर ठराविक दिवसात गॅस वितरण ची गाडी भागात येणे अपेक्षित असते. मात्र, बुकिंग करूनही अनेक दिवस उलटले तरी गाडी फिरकतच नाही, अशी तक्रार ग्राहकांनी केली आहे. या संदर्भात देवरुख येथील गॅस वितरण कार्यालयाशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास, बहुतांश वेळा फोन उचलला जात नाही. चुकून फोन उचलला तरी तिथल्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची आणि योग्य उत्तरे दिली जात नसल्याचा गंभीर आरोप ग्राहकांनी केला आहे.
या संदर्भात आपली प्रतिक्रिया देताना संगमेश्वर रामपेठ येथील प्रतिष्ठित गणेश शेरे म्हणाले की, गॅस बुकिंग करूनही गाडी वेळेवर येत नसल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही, उलट ग्राहकांची अडवणूक केली जाते. गॅस ही अत्यावश्यक सेवा असतानाही देवरुख एजन्सीकडून होणारी ही टाळाटाळ अत्यंत दुर्दैवी आहे. जर ही परिस्थिती सुधारली नाही, तर अनेक ग्राहक आपले कनेक्शन रद्द करून इतर पर्यायांचा विचार करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर आशिष शेट्ये , विनायक खातू, मिलिंद भिंगार्डे, अनिकेत खातू हे एचपी गॅस ग्राहक असून त्यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, “गॅस ही अत्यावश्यक सेवा असतानाही देवरुख एजन्सीकडून होणारी ही टाळाटाळ अत्यंत दुर्दैवी आहे. जर ही परिस्थिती तातडीने सुधारली नाही, तर आम्ही सर्व ग्राहक आपले कनेक्शन रद्द करून इतर पर्यायांचा विचार करू.”
सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांना नाइलाजास्तव खासगी वाहने भाड्याने करून देवरुख येथील मुख्य एजन्सीकडे जावे लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तिथे पोहोचल्यानंतरही सुटका होत नाही; तासनतास कडक उन्हात रांगेत उभे राहिल्यावरच सिलेंडर हाती पडतो. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून, घरपोच सेवा केवळ नावापुरतीच उरली आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
HP गॅसच्या या त्रासाला कंटाळून यापूर्वी काही ग्राहकांनी आपले कनेक्शन रद्द करून भारत गॅसची जोडणी घेतली आहे. त्यांची सेवा वेळेवर मिळत असल्याचे पाहून, आता संगमेश्वर भागातील इतर त्रस्त ग्राहकांनीही एकत्र येऊन HP गॅस सोडण्याचा निर्धार केला आहे. आम्ही पैसे भरून आणि बुकिंग करूनही आम्हाला सुविधा मिळत नसेल, तर अशा कंपनीची सेवा घेण्यात काय अर्थ, असा सवाल आता ग्राहकांनी केला आहे. आता या प्रकरणावर जिल्हा पुरवठा विभाग काय पाऊल उचलणार आणि देवरुख येथील एजन्सी आपली सेवा सुधारणार का, याकडे संपूर्ण संगमेश्वर भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.

