(ठाणे)
वसई पश्चिम भागात चार वर्षीय निष्पाप चिमुकल्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक प्रकारात मुलगा विघ्नेशच्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरारोड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई येथील ‘अनुपम हाउसिंग सोसायटी’मध्ये ही खळबळजनक घटना घडली. या ठिकाणी राहणारे अतुल कोंढारे आणि त्याच सोसायटीत राहणारा रिक्षाचालक संदीप पवार (वय 57) यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपीने अतुल कोंढारे यांचा चिमुकला विघ्नेशबाबत हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी सोसायटी परिसरात काही मुले खेळत होती. त्यावेळी ती मुले आरोपीच्या रिक्षात जाऊन बसली होती. याचवेळी आरोपी तेथे आला आणि त्याने इतर मुलांना हाकलून दिले. मात्र चार वर्षीय चिमुकल्याला पकडून त्याचे डोके रिक्षावर आपटले आणि त्यानंतर त्याला उचलून जमिनीवर फेकत निर्दयीपणे मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या अमानुष मारहाणीमुळे चिमुकला गंभीर जखमी झाला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्याच्या आजीवरही आरोपीने हल्ला केला. जखमी मुलाला सुरुवातीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोन ते तीन रुग्णालयांनी उपचार घेण्यास नकार दिला. अखेरीस मिरारोड येथील रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी संदीप पवारला अटक केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जुन्या वादातूनच ही मारहाण करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

