(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील धम्मक्रांती कला मंचाच्या वतीने येत्या मे महिन्यात ‘बुद्ध-भीम संयुक्त जयंती महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जाकादेवी येथे नुकतीच विशेष सभा पार पडली असून, महोत्सवाचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. या सभेत विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक उपक्रमांची आखणी करत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
जाकादेवी येथील प्रसिद्धी प्रमुख संतोष पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी कला मंचाचे अध्यक्ष रविकांत पवार होते. सभेत महोत्सवाच्या स्वरूपावर सखोल चर्चा झाली. समाजप्रबोधन आणि कलाविकास या दुहेरी उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवत हा महोत्सव आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
धम्मक्रांती कला मंचाची स्थापना झाल्यापासून समाजातील होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे आणि कला प्रेमींसाठी दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी निर्माण करणे, या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जात आहेत. विशेष म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचा आणि कला प्रेमाचा संगम साधत समाजातील कलाकारांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न कला मंचाच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे. त्याच धर्तीवर बुद्ध-भीम संयुक्त जयंती महोत्सव हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.
सभेत झालेल्या चर्चेनुसार, जाकादेवी येथे ९ मे रोजी हा महोत्सव आयोजित करण्याचे संभाव्य नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रबोधनात्मक व्याख्याने, बुद्ध-भीम गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच समाजजागृतीपर उपक्रमांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमातून सामाजिक एकात्मता, बंधुता आणि विचारप्रबोधनाचा संदेश देण्यावर भर राहणार आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत कला मंचाने विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात साजऱ्या करण्यात आलेल्या त्यागमूर्ती माता रमाई जयंती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. हा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला असून, त्यातून कला मंचाच्या कार्यक्षमतेची प्रचिती आली होती. याच यशाच्या बळावर पुढील काळात आणखी विधायक आणि प्रभावी कार्यक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून त्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर माता रमाई जयंती कार्यक्रमाच्या उत्पन्न-खर्चाचा तपशील सादर करून मंजुरी घेण्यात आली. तसेच मासिक सभासद वर्गणी वसुली, त्यातील अडचणी आणि सुधारणा यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. काही सदस्यांच्या अनुपस्थितीबाबतही विचारविनिमय करत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले.
पुढील काळात अधिक व्यापक आणि परिणामकारक उपक्रम राबवण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बुद्ध-भीम संयुक्त जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्यांकडून आतापासूनच जय्यत तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रविकांत पवार यांनी दिली. तसेच लवकरच अंतिम नियोजनासाठी आणखी एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या विशेष सभेला अध्यक्ष रविकांत पवार, उपाध्यक्ष सुरेश कांबळे, खजिनदार गौतम सावंत, चिटणीस सतीश कदम, उपचिटणीस संदीप जाधव, सदस्य प्रशांत जाधव, प्रसिद्धी प्रमुख संतोष पवार, दिनकर कांबळे, सुनील कांबळे, वैभव पवार आदींसह इतर सदस्य उपस्थित होते.

