( मुंबई )
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC) च्या आयुक्तपदी IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मंगळवारी (31 मार्च) विद्यमान आयुक्त भूषण गगराणी सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या जागी भिडे पदभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे, त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आयुक्तपदासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चुरस पाहायला मिळत होती. या पदासाठी असीमकुमार गुप्ता आणि डॉ. मिलिंद म्हैसकर यांचीही नावे चर्चेत होती. या पदासाठी असिम गुप्ता यांच्या नावाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आग्रही मागणी केली जात होती. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विनी भिडे यांच्या नावासाठी आग्रही होते. मात्र अखेर अश्विनी भिडे यांनी बाजी मारत हे प्रतिष्ठेचे पद पटकावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख
1995 बॅचच्या IAS अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कामामुळे त्यांना ‘मेट्रो वूमन’ अशी ओळख मिळाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) सचिव म्हणूनही काम पाहिले असून देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी त्या एक मानल्या जातात. मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी यापूर्वी काम केल्याने त्यांना नगर प्रशासनातील बारकाव्यांची चांगली जाण आहे.
या नियुक्तीमुळे मुंबई महापालिकेत महिला नेतृत्व अधिक बळकट झाले आहे. यापूर्वी महापौरपदी ऋतु तावडे यांची निवड झाली होती. आता आयुक्तपदीही महिला अधिकारी आल्याने प्रशासनात नवा बदल दिसून येणार आहे.
दरम्यान, सेवानिवृत्त होत असलेले भूषण गगराणी हे मुदतवाढीसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. मात्र सेवा नियमांनुसार मुख्य सचिव वगळता इतर अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्यामुळे त्यांना वाढ मिळाली नाही.
अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीमुळे मुंबई महापालिकेच्या कारभारात नवे नेतृत्व आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या विकासकामांना होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

