(राजापूर / तुषार पाचलकर)
ग्रामीण रुग्णालय, राजापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रक्त साठवणूक केंद्र (ब्लड स्टोरेज युनिट) सुरू करण्यात येत असून त्याचे उद्घाटन शनिवार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे. या केंद्रामुळे तालुक्यातील रुग्णांना तातडीच्या वेळी रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून आरोग्य सेवेत महत्त्वाची भर पडणार आहे.
उद्घाटन स्थानिक आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला खासदार नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सभापती नंदिनी केंद्रे, उपसभापती अभिजित गुरव, नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, तहसीलदार विक्रम गंबरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. जॅस्मिन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे, तसेच पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

