(राजापूर / तुषार पाचलकर)
ओणी–पाचल–अनुस्कुरा या महत्त्वाच्या मार्गावर गेल्या काही वर्षांत वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग पर्यायी आणि सोयीस्कर मानला जात असल्याने दिवसभर या मार्गावर चारचाकी, दुचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची वर्दळ वाढलेली असते. मात्र वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची योग्य देखभाल आणि दुरुस्ती करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
या मार्गावरील नवीन रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. पाचल येथील आठवडा बाजार परिसरात तर ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. गेल्या तीन दिवसांत या ठिकाणी दोन वाहनांचे अपघात होऊन गाड्यांचे नुकसान झाले आहे.
यापूर्वी सुमारे दोन महिन्यांपूर्वी देखील एक चारचाकी वाहन रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याची घटना घडली होती. वारंवार अपघात घडत असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज (सोमवारी) रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास पाचल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयालगत आणखी एक अपघात घडला. गोव्याहून अनुस्कुरा मार्गे बत्तीस शिराळा येथे जात असलेली GA-03-AM-7734 क्रमांकाची मारुती कंपनीची नवी चारचाकी कार रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्त्याच्या कडेला घसरून अपघात झाला. या अपघातात चालक प्रकाश सोनुले (वय ४५) हे वाहन चालवत होते.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाने कोणत्याही प्रकारचे मद्यप्राशन केलेले नव्हते. रस्त्यावरील खड्डे व अंधारामुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या मार्गावर सतत अपघात होत असल्यामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच धोकादायक ठिकाणी इशारा फलक व प्रकाशयोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

