(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावचे ज्येष्ठ समाजसेवक, मार्गदर्शक आणि विविध सामाजिक उपक्रमांचे प्रेरणास्थान असलेले श्रीधर बाबू पावसकर हे आज (दि. २ जून) वयाची ९० वर्षे पूर्ण करून नव्वदीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिठगवाणे गावासह विविध सामाजिक, धार्मिक आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मिठगवाणे येथील सुवर्णवाडीचे रहिवासी असलेले श्रीधर पावसकर हे कै. बाबू सदाशिव पावसकर यांचे द्वितीय सुपुत्र आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर अल्पवयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत उपजीविकेसाठी त्यांनी मुंबई गाठली. संघर्षमय जीवन जगताना दिवसा काम आणि रात्री शिक्षण अशी कसरत करत त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मुंबईत ताडपत्री व्यवसायाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी व्यवसायात उल्लेखनीय यश मिळविले. त्यांच्या कार्यकौशल्याची दखल घेत त्यांना दोन वेळा परदेश दौऱ्याची संधीही मिळाली. मात्र यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांनी आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.
वयाच्या ६५ व्या वर्षी व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उर्वरित आयुष्य समाजकार्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मिठगवाणे येथे स्थायिक झाले. गावात परतल्यानंतर त्यांनी तेली समाज मंडळाची स्थापना करून समाज संघटन आणि समाजविकासासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
त्यांच्या नेतृत्वाखाली ६ नोव्हेंबर २०२२ रोजी कार्तिकोत्सवानिमित्त भव्य तेली समाज मेळावा व मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी तब्बल ५०० मशालींची निर्मिती, तेल संकलन, आवश्यक साहित्याची उपलब्धता आणि संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. हजारो समाजबांधव, ढोल पथके आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा प्रकाशोत्सव परिसरातील संस्मरणीय सामाजिक सोहळा ठरला.
समाजकार्यातील त्यांची धडपड यानंतरही अखंड सुरू राहिली. श्री. विलास चेऊलकर यांच्या सहकार्याने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी मिठगवाणे ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले. रस्त्यालगत वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रतपासणी, रक्ततपासणी, रक्तदान शिबिरे, धार्मिक व सांस्कृतिक सहली तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले.
आज नव्वदीत पदार्पण करत असतानाही श्रीधर पावसकर यांच्यातील कार्यतत्परता, समाजसेवेची तळमळ आणि लोकांप्रती असलेली आत्मीयता तितकीच कायम आहे. “वय हे केवळ आकड्यांमध्ये मोजले जाते; सेवा, जिद्द आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मात्र सदैव तरुण राहते,” याचे जिवंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त मिठगवाणे ग्रामस्थ, तेली समाज, ज्येष्ठ नागरिक संघ तसेच विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

