(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील जवळेथर (गोसावीवाडी) येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी जयकुमार उर्फ तातू सखाराम मोरे (वय ६५) याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११:४५ वाजता करण्यात आली. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल रामदास बाबासो पाटील (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसताना विक्रीसाठी गोवा बनावटीचा दारूसाठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मोरे यांच्या घराच्या मागील बाजूस, आंब्याच्या झाडाखाली छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ४८० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. यामध्ये ‘बोब्स लेमन व्होडका’च्या १८० मिलीच्या ११ सीलबंद बाटल्या (किंमत ३३० रुपये) तसेच ‘हनी ब्लेंड’च्या १८० मिलीच्या ५ सीलबंद बाटल्या (किंमत १५० रुपये) यांचा समावेश आहे.
हा सर्व साठा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
दरम्यान, जवळेथर आणि परिसरात गोवा बनावटीच्या तसेच गावठी दारूच्या अवैध विक्रीबाबत स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती असूनही कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी ओणी-अनुस्कुरा महामार्गालगत गावठी दारूवर छापा टाकण्यात आला होता; मात्र काही काळानंतर पुन्हा असे प्रकार सुरू झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

