(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ई-चलन दंड आकारल्याचा बनावट संदेश पाठवून सायबर भामट्यांनी एका तरुणाला तब्बल ६ लाख २९ हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत उघडकीस आली आहे. मोबाईलवर आलेल्या संदेशातील लिंक उघडणे महागात पडले असून, सायबर चोरट्यांनी मोबाईल हॅक करून दोन बँक खात्यांमधील लाखो रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. याप्रकरणी तौकीर मकबूल सोलकर (वय ३२, रा. कोहिनूर हेरिटेज, मांडवी रोड, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
१४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर वाहतुकीच्या नियमांशी संबंधित ई-चलन दंड आकारल्याचा संदेश पाठविला. या संदेशामध्ये दिलेली लिंक फिर्यादी यांनी उघडली. त्यानंतर सायबर भामट्यांनी मोबाईल हॅक करून त्याचा गैरफायदा घेतला. बँक ऑफ इंडिया आणि सारस्वत बँकेतील खात्यांमधून एकूण ६ लाख २९ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली.
या प्रकरणी १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४९ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक दंडाच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करणे आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. सरकारी यंत्रणेच्या नावाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा संदेशांबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणतीही अनोळखी लिंक उघडण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे आवश्यक आहे.


