(मंडणगड/ रत्नागिरी)
घरकुल मंजूर झाल्याचे आमिष दाखवत तहसील कार्यालयातून आल्याची बतावणी करून एका भामट्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची घटना मंडणगड तालुक्यातील दुर्गवाडी येथे घडली आहे. घरकुल मंजुरीसाठी दोन हजार रुपये भरावे लागतील, असे सांगत पैसे नसल्यास गळ्यातील सोन्याची बोरमाळ देण्याची मागणी आरोपीने केली. त्यानंतर सुमारे ८० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ घेऊन त्याने पोबारा केला. ही घटना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ वाजण्याच्या सुमारास घर क्रमांक ४७८, दुर्गवाडी, मंडणगड येथे घडली. याप्रकरणी नरेश सदानंद बैकर (वय ४५, रा. दुर्गवाडी, मंडणगड) यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या आई कलावती सदानंद बैकर या घटनेच्या वेळी घरी एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपी त्यांच्या घरी आला. आपण मंडणगड तहसीलदार कार्यालयातून आलो असून, तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे. त्यासाठी दोन हजार रुपये भरावे लागतील. तसेच फोटो आणि आधारकार्ड आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. सरकारी कार्यालयाशी संबंधित व्यक्ती असल्याचा भास निर्माण करून त्याने वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. पैसे नसल्याचे समजल्यानंतर गळ्यातील बोरमाळ देण्यास सांगितले. त्यानुसार महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या कड्यांमध्ये गुंफलेली गोल मणी असलेली, १५ ग्रॅम वजनाची आणि ८० हजार रुपये किमतीची बोरमाळ घेऊन आरोपी पसार झाला.
या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख सुरेश सुरक्या गवस्कर (वय ४७, रा. नागाव, ता. माणगाव, जि. रायगड) अशी निष्पन्न झाल्याची माहिती फिर्यादीत नमूद आहे. मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय योजनांच्या नावाखाली नागरिकांचा विश्वास संपादन करून लूट करण्याचे प्रकार चिंताजनक असून, अनोळखी व्यक्तीने घरकुल किंवा अन्य शासकीय योजनेच्या मंजुरीसाठी पैशांची अथवा दागिन्यांची मागणी केल्यास नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.


