(चिपळूण)
चिपळूण शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट आणि मार्कंडी भागातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पागमळा येथील एका अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट लक्ष्य करत चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि तेथून रोख रक्कम लंपास केली. तर मार्कंडी परिसरात तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली.
या घटनेप्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याचा सखोल अभ्यास केला जात आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसून आले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी हालचालींना वेग दिला आहे. शहरात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असून, पोलिसांनी गस्त वाढवून ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

