(राजापूर / तुषार पाचलकर)
राष्ट्रीय पातळीवरील पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरी जिल्ह्यातील रिंगणे (ता. लांजा) येथील मानसी संजय सांधे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सध्या मानसी मुंबईतील जोगेश्वरी (शामनगर) येथे पालकांसह वास्तव्यास आहे. तीने झुनझुनवाला महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. कबड्डी हा तिचा आवडता खेळ असला तरी कोरोना काळात सराव बंद झाल्याने तिने व्यायाम सुरू ठेवण्यासाठी स्थानिक व्यायामशाळेत जाणे सुरू केले. याच ठिकाणी तिच्या सरावातील ताकद आणि निष्ठा पाहून प्रशिक्षकांनी तिला पाॅवर लिफ्टिंगकडे मार्गदर्शन केले.

थोड्याच कालावधीत मानसीने हा खेळ आत्मसात करून स्थानिक तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले. अखेर राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत तिने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या यशामुळे आता तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुभाष लाड यांनी मानसीच्या निवासस्थानी भेट देऊन तिचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शांताराम पाटकर, गणेश चव्हाण आणि रमेश काटकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

