(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे स्नेहबंध माहेरवाशीन मध्यविभाग, फेपडेवाडी यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला कुटुंब स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माहेरवाशीन, सासुरवाशीन, भाऊ तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा कोल्हापुरी फेटे बांधून सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी कुलदैवताचे दर्शन घेत गणेश मंदिर, हनुमान मंदिर आणि श्रीराम मंदिर येथे प्रदक्षिणा घातली. या वेळी ज्येष्ठ ग्रामस्थ गणुजी हिरू फेपडे यांच्या हस्ते बहुउद्देशीय समाज ज्ञान मंदिर या संकल्पनेच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले.
तसेच भिकाजी हिरू फेपडे, रामचंद्र बाबू फेपडे, विश्वनाथ फेपडे, परशुराम फेपडे तसेच अनिता बडद आणि राजश्री पानगले यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त विलासजी कानर गुरुजी यांनी कुटुंब स्नेहमेळाव्याचे आणि समाज ज्ञान मंदिर उभारणीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी माहेरवाशीनसोबतच्या आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला.
हळदीकुंकू कार्यक्रमात पारंपरिक वाणाबरोबरच सामाजिक भान जपण्याच्या हेतूने सुमारे १५० महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली.
यानंतर सामूहिक भोजन, तसेच विविध वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सासुरवाशीन विरुद्ध माहेरवाशीन या स्पर्धेत माहेरवाशीन संघ विजयी ठरला.
रात्री लहान मुलांचे आणि महिलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी स्नेहमेळावा समिती, ग्रामस्थ, माहेरवाशीन आणि सासुरवाशीन यांनी विशेष परिश्रम घेतले. एकूणच, हा मेळावा नात्यांमध्ये आपुलकी वाढवणारा आणि समाजएकतेचा संदेश देणारा ठरला.

