(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील नगरपरिषद प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची बिकट अवस्था आता नागरिकांच्या संयमाची मर्यादा ओलांडणारी ठरत असून, या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्र्यात उतरली आहे. प्रभागातील कोकणनगर, कीर्तनगर, क्रांतिनगर तसेच स्टेट बँक कॉलनी परिसरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात अडकले असून, दैनंदिन प्रवास नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची आठ दिवसांच्या आत दुरुस्ती न झाल्यास तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, स्थानिक नगरसेवक केतन शेट्ये यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले होते; मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास बाब आणूनही रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची अशी दयनीय अवस्था निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने सर्व रस्त्यांची दुरुस्ती किंवा नूतनीकरण पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अपरिहार्य ठरेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन सादर करताना सौ. शिवानी सावंत माने, केतन शेट्ये, फौजिया मुजावर, अमित विलणकर, शेखर घोसाळे, विजय देसाई, मयुरेश पाटील, प्रशांत शंकरराव साळुंखे, प्रसाद सावंत, नितीन तळेकर, सलील डाफले, दिलावर गोदड, विशाल कदम, साजिद पावसकर, प्रशांत सुर्वे, राजाराम रहाटे, सुफीयान जयगडकर, तन्वीर मुजावर, प्रसन्न सुर्वे, अक्षय कांबळे आणि इम्रान मुकादम आदी उपस्थित होते.

