(मुंबई / नाशिक)
नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी राजकीय घडामोड घडली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र देत पदाचा राजीनामा सादर केला. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सायंकाळी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द केला.

काय आहे प्रकरण?
नाशिकमधील एका ३५ वर्षीय महिलेने आरोपी अशोक खरात याच्यावर गेल्या तीन वर्षांत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात इतरही काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाकणकर यांच्यावर खरातसोबत कथित संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधकांकडून टीका वाढली होती. त्यामुळे राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.
विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही! स्वेछेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे! म्हणजे खरात प्रकरणात त्यांनी महिलांवर,पत्रकारांवर टाकलेला दबाव ,या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले उद्योग याचा कुठलाही खेद,चूक झाली अस त्यांना वाटत नाही! राजीनामा देताना पण उपकार असल्यागत चाकणकर यांचे वागणे निषेधार्ह आहे! रूपाली चाकणकर हा छोटा मासा आहे यात अजून किती मंत्री होते कोणी या बलात्कारी बाबाला राजाश्रय दिला,वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे हे प्रकरण दाबण्यासाठी कोणत्या नेत्यांनी, मंत्र्यांनी फोन केले याचीही चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे
सरकारची भूमिका
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या प्रकरणात अनेक पैलू समोर येत आहेत. सखोल चौकशीनंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होईल. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.” तसेच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खरातच्या हिताचा निर्णय घेतल्याच्या आरोपांबाबतही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत आमच्यापर्यंत माहिती आलेली नाही. मात्र, अशा बाबी घडल्या असतील तर त्याची चौकशी केली जाईल. तसंच संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल,” असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले.
मी अशोक खरातला गुरू मानलं होतं – रुपाली चाकणकर
राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी म्हटले की, ‘खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबाने गुरू मानलं होते, त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रमांना हजर रहायचो. मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाद्यपुजा केली होती, माझ्या पतीनेही पूजा केली, हा 6 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होता. आज सोबत असलेले लोक पुढे कसे वागतील हे आपल्याला माहिती नसतं. माहिती समजताच मला धक्का बसला. मी अध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला होता पण खरातची दुसरी बाजू माहिती नव्हती. जे काही घडलं आहे ते अतिशय चुकीचं आणि घाणेरडं कृत्य आहे. त्याच कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी सखोल तपास करावा, पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे.
या प्रकरणात पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.

