(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव मधील गोताडवाडी येथे येत्या ३ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजता एक दर्जेदार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. हनुमान सेवा मंडळ, श्री देव हनुमान मंदिर यांच्या वतीने आयोजित हनुमान जयंतीच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने रत्नागिरीतील तरवळ गावचे सुपुत्र सचिन शितप लिखित व दिग्दर्शित ‘एक होतं गाव’ हे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर केले जाणार आहे.
गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या एका जिद्दी तरुणाची प्रेरणादायी कथा, तरुणाईची जिद्द आणि ग्रामविकासाचा वेध घेणारा विषय या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आपल्या मातीतल्या कलाकारांचा दमदार अभिनय आणि विचार करायला लावणारी मांडणी यामुळे हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
या संदर्भात नाट्यलेखक व दिग्दर्शक सचिन शितप म्हणाले की, “आजवर मी दहा नाटकांचे लेखन केले असून ‘एक होतं गाव’ हे सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे नाटक आहे. रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.”
सदर नाट्यप्रयोग श्री हनुमान मंदिर रंगमंच, खालगाव (गोताडवाडी), ता. जि. रत्नागिरी येथे सादर होणार असून, जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

