(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथे शुक्रवारी सायंकाळी एका काळजाचा थरकाप उडविणाऱ्या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. जाकादेवी मार्गे ग्रीट (खडी) भरून येणारा दहा चाकी डंपर (क्रमांक KA 33B/0243) फुणगूस पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर असलेल्या तीव्र उतारावर आणि अत्यंत अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने थेट रस्त्याखाली पलटी झाला. या भीषण अपघातात डंपरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला आणि चालक राऊत राय हे त्यामध्ये गंभीर अवस्थेत अडकून पडले. सुमारे चार तास चाललेल्या मृत्यूशी झुंजीनंतर आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अतुलनीय साहसानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
आज (शुक्रवारी) सायंकाळी ४ ते साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. उतारावर डंपरचा वेग अनियंत्रित झाल्याने तो थेट खाली कोसळला. मोठा आवाज होताच आजूबाजूच्या वाडीतील नागरिक, रिक्षा चालक-मालक आणि पोलीस पाटील प्रशांत थूळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डंपरच्या चेपलेल्या कॅबिनमधून चालक राऊत राय यांचा ‘वाचवा-वाचवा’ असा आर्त हंबरडा येत होता. त्यांचे पाय स्टेरिंगमध्ये अशा पद्धतीने अडकले होते की, डंपर उभा केल्याशिवाय त्यांना बाहेर काढणे अशक्य होते.
बचावकार्यासाठी तातडीने एक हायड्रा मशीन पाचारण करण्यात आले, मात्र डंपर दहा चाकी आणि ग्रीटचा भार असल्याने तो हायड्रा अपयशी ठरला. त्यानंतर तातडीने दुसरा हायड्रा मागवण्यात आला, परंतु वाहन प्रचंड अवजड असल्याने त्यालाही यश आले नाही. एकीकडे मदतीसाठी लोकांची मोठी गर्दी आणि त्यांची धडपड सुरू होती, तर दुसरीकडे गंभीर अवस्थेत असलेला चालक सुटण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत होता. दरम्यान, सायंकाळ सरून सर्वत्र काळोख पसरला होता, मात्र या अंधारातही स्थानिक ग्रामस्थांनी हार न मानता टॉर्च आणि मोबाईलच्या उजेडात आपले मदतकार्य जिद्दीने सुरूच ठेवले.
अखेर कटर मशीनची व्यवस्था करण्यात आली आणि अतिशय सावधगिरीने कॅबिनचा काही भाग कापून तब्बल चार तासांच्या थरारानंतर चालक राऊत राय यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टर मोरे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, मात्र त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला आहे.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे तीव्र उतार आणि अवघड वळण असल्याने हे ठिकाण आता अपघातांचे केंद्र बनले आहे. गेल्या वर्षभरात याच एका ठिकाणी ७ ते ८ भीषण अपघात झाले असून, प्रशासनाने या जीवघेण्या वळणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

