(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी येथील सहाणवाडी शिवस्मृती प्रतिष्ठान यांचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जागर संविधानाचा या विषयांतर्गत प्रसिद्ध समाजप्रबोधक व्याख्याते माधव विश्वनाथ अंकलगे सर यांचे विशेष प्रबोधनपर मार्गदर्शन लागले.
यावेळी व्याख्याते माधव अंकलगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शन करताना संविधानाची माहीती सांगून प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून स्वतःचे हक्क जोपासले पाहिजेत. ज्या परिस्थितीत संविधानाची निर्मिती करण्यात आली, त्या परिस्थितीची सर्वानी जाणीव ठेवल्यास प्रत्येकाला आपापले अधिकार आणि कर्तव्ये समजतील यासाठी सदैव संविधानाचा विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सहाणवाडी शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य तथा प्रतिष्ठानचे सचिव अमित पायरे, प्रतिष्ठानचे खजिनदार अनंत पवार, सामाजिक कार्यकर्ते लहू भातडे, चाफेरी क्रमांक १ शाळेचे शिक्षक संतोष जाधव, चाफेरी क्रमांक २ चे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तांबे, सचिन भातडे, दिपक सुर्वे, यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.