(चिपळूण / प्रतिनिधी)
लोटे एमआयडीसी परिसरातील वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप पुन्हा एकदा तीव्र झाला असून, कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण विभागीय कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करत विविध गंभीर मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना जाब विचारला.
चिपळूण येथील विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रादेशिक अधिकारी कुलकर्णी अपघातग्रस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत क्षेत्र अधिकारी शिंगारे उपस्थित होते. या वेळी भरत लब्धे, पंकज दळवी, सिराज दलवाई, अल्ताफ कादरी, तुळशीराम पवार, डॉ. शमीना परकार, स्वाती भोजने आणि वीणा जावकर यांनी प्रदूषणासंदर्भातील प्रश्नांची सरबत्ती करत प्रशासनासमोर ठोस मागण्या मांडल्या. बैठकीत लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून सांडपाणी वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टँकरची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित टँकर पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप समितीने केला असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
तसेच सोनगाव येथे रसायनमिश्रित पाण्यामुळे दुभती जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची चौकशी करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योगांकडून बोअरवेलच्या माध्यमातून सांडपाणी थेट भूगर्भात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करत तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
प्रदूषणामुळे आंबा आणि काजू यांसारख्या कोकणातील प्रमुख पिकांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सामान्य सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याने दाभोळ खाडी प्रदूषित होत असून, स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर प्रतिक्रिया देताना क्षेत्र अधिकारी शिंगारे यांनी प्रादेशिक अधिकारी कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घेतला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या आंदोलनावेळी सुवर्णा बैंडके, विनायक जाधव, चंद्रकांत मोहिते, बी. डी. कदम, बाबा चव्हाण, बाळशेठ लांबे, राजा लांबे, मन्सूर सय्यद, कासिम सय्यद, केशव लांबे यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

