(चिपळूण)
तालुक्यातील काविळतळी ते चिपळूण बाजारपेठ मार्गावर भरधाव टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविराज जनार्दन पाटील (वय ५१, व्यवसाय धंदा, सध्या रा. साईनगर, अवेरे कॉम्प्लेक्स, गुहागर) हे पत्नी रिना यांच्यासह स्पेलंडर या दुचाकीवरून खरेदी करून चिपळूण बाजारपेठेकडे जात होते. काविळतळी परिसरातून पुढे सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर आले असता मागून आलेल्या टँकर NL01/Q/8054 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, टँकर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन हयगईने व बेदरकारपणे चालवल्याने हा अपघात घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या धडकेत रविराज पाटील यांच्या उजव्या पायाला तसेच उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नी रिना पाटील यांच्या डाव्या पायाच्या पंजाला, पोटरीला आणि कंबरेला गंभीर मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी टँकर चालक संदीपकुमार (पूर्ण नाव व पत्ता अद्याप स्पष्ट नाही) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पुढील तपास पोलिस करत आहेत.

