(नवी मुंबई)
‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. त्यांचे बलिदान केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहादतीचा इतिहास समाविष्ट केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यासोबतच नवी मुंबई परिसरात त्यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने खारघर येथे आयोजित श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र–पंजाब ऐतिहासिक नाते
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शीख समाजाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी 1675 मध्ये भारतीय संस्कृती आणि धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वाभिमानाने आपली श्रद्धा जोपासू शकतो. त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात शहिदी समागम आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र आणि पंजाब यांचे नाते ऐतिहासिक असल्याचे सांगत त्यांनी संत नामदेव महाराजांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट असल्याचा उल्लेख केला. तसेच शीखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांनी नांदेड येथे अखेरचा श्वास घेतल्याची आठवण करून दिली. गुरु गोविंद सिंह यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी शहादत दिल्याचे उदाहरण जगात दुर्मिळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अमित शहा: मानवजातीसाठी प्रेरणादायी बलिदान
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी आपले शीर अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा सदैव ऋणी राहील.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्याकडे शस्त्रे नव्हती, पण सत्य आणि करुणेची अपार शक्ती होती. अन्यायाविरुद्ध उभे राहून त्यांनी गोरगरिबांना न्याय दिला.” उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, “कुणालाही घाबरवू नका आणि कुणालाही घाबरू नका, हा संदेश आजच्या काळात अधिकच महत्त्वाचा आहे. समाजात प्रेम, एकता आणि बंधुभाव जोपासण्याची गरज आहे.”
350 वा शहिदी समागम कार्यक्रम हा केवळ श्रद्धांजली नसून, भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

