(राजापूर / प्रतिनिधी)
तालुक्यातील विलये येथील गुरववाडीत रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी निघालेल्या रिक्षाचालकाला अडवून शिवीगाळ, मारहाण आणि कोयत्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार २४ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप दौलत गुरव (वय ३३, व्यवसाय शेती व रिक्षा चालक) हे आपल्या चुलत्यांना दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा घेऊन जात असताना त्यांच्या वाडीतील गणपत दत्ताराम मांडवकर हा रिक्षासमोर आडवा आला. यावेळी त्याने फिर्यादी संदीप गुरव यांना शिवीगाळ सुरू केली. याबाबत जाब विचारताच आरोपी घरात जाऊन दोन कोयते घेऊन परत आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संशयित आरोपीचा भाऊ राजेंद्र दत्ताराम मांडवकर याने फिर्यादीला समोरून पकडून शिवीगाळ करत हाताच्या थपडा मारल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी गणपत मांडवकर याने कोयत्याच्या मागील बाजूने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर प्रहार करून दुखापत केली. या घटनेनंतर काही वेळात फिर्यादीचा भाऊ प्रफुल्ल गुरव घटनास्थळी पोहोचला असता, गणपत मांडवकर पुन्हा हातात कुऱ्हाड घेऊन आला आणि “आता तुम्हाला ठार करतो,” अशी धमकी देत संतप्त वातावरण निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी गणपत दत्ताराम मांडवकर आणि राजेंद्र दत्ताराम मांडवकर, दोघेही रा. विलये, गुरववाडी, ता. राजापूर यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१), ३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

