भारतासाठी महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री Abbas Araghchi यांनी होर्मुज सामुद्रधुनीबाबत मोठे विधान करत भारतासह काही मित्र राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गाने प्रवास करण्यास परवानगी दिल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे भारतातील इंधन तुटवड्याची शक्यता कमी होऊन पुरवठा सुरळीत राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या मित्र देशांच्या जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, होर्मुज सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिल्यास जागतिक स्तरावर तेल, गॅस आणि खतांच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे नागरिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्वरित युद्धविराम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, António Guterres यांनीही अमेरिका आणि इस्रायलला पश्चिम आशियातील संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. “आता युद्ध संपवण्याची वेळ आली आहे. नागरिकांचा जीव जात आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी इराणलाही शेजारी देशांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले.
‘गैर-शत्रुत्वपूर्ण’ जहाजांना अटींसह परवानगी
यापूर्वी १५ मार्च रोजी न्यूयॉर्कमधील इराणच्या मिशनने ‘गैर-शत्रुत्वपूर्ण जहाजांना’ होर्मुज सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, ही परवानगी इराणी अधिकाऱ्यांशी समन्वय साधूनच दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. इराणी संरक्षण परिषदेनेही यावर शिक्कामोर्तब करत, सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरक्षा नियमांचे पालन आणि इराणी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखालीच राहील, असे सांगितले आहे.
या घडामोडीमुळे भारतासारख्या ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसाठी मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळात इंधन पुरवठा आणि दर स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

