(राजापूर / तुषार पाचलकर)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील हातिवले टोल सुरू करण्याच्या हालचालींविरोधात राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहनचालक आणि शेतकरी एकवटले आहेत. स्थानिकांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन सादर करण्यात आले.
महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी दर्जाहीन कामामुळे अपघात होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भू-संपादनाचा मोबदला, सर्विस रोड, स्ट्रीट लाईट, बसथांबे, सुरक्षा सुविधा यांसह अनेक मूलभूत कामे प्रलंबित असताना टोल वसुली सुरू करणे अन्यायकारक असल्याची भूमिका उपस्थितांनी मांडली.
यापूर्वी स्थानिकांच्या तीव्र आंदोलनामुळे आणि निलेश राणे यांच्या पुढाकाराने हा टोल बंद करण्यात आला होता. मात्र, पुन्हा टोल सुरू करण्याच्या हालचालींमुळे राजापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आंदोलनाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे हातिवले टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या वेळी अरविंद लांजेकर, प्रतीक सप्रे, संदीप राऊत, भाई घालवलकर, आबा आडीवरेकर, महेश कारेकर, गिरीश करंगुटकर, राजन लाड, रमेश गुणे, मोहम्मद गोलंदाज, रोहन गिरकर, कैलास कोठारकर, बंड्या गादिककर, मुद्दसर काझी, विलास गुरव, जितेंद्र खामकर, देविदास राघव, राहुल वर्दै, अमोल बोळे, कमलाकर कदम, जयकांत मोरे, अस्मित कदम, सुनील करंगुटकर, भरत लाड आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

