(दापोली)
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर २५ मार्च रोजी झालेल्या हल्ल्याच्या घटनेने पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दापोली तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकार दीपक भागवत हे चिपळूण नागरी पतसंस्थेशी संबंधित उपोषणाच्या वृत्तांकनासाठी बहादूर शेख नाका परिसरात गेले होते. यावेळी काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. कर्तव्य बजावत असताना पत्रकारावर झालेला हा हल्ला गंभीर मानला जात असून, यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे. “कर्तव्य बजावताना पत्रकारांवर हल्ले होणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
या घटनेच्या निषेधार्थ दापोलीतील पत्रकारांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले. हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. “हल्लेखोरांना त्वरित अटक झाली नाही, तर अशा घटनांना प्रोत्साहन मिळेल,” असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर मनोज पवार, शैलेंद्र केळकर, जगदीश वामकर, महेश महाडिक, प्रसाद रानडे, आनंद करमरकर, राधेश लिंगायत, बाळासाहेब नकाते, सलीम रखांगे, डॉ. प्रशांत परांजपे, प्रशांत कांबळे, समशाद खान, रुपेश वाईकर, ज्योती बिवलकर आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.
पत्रकारांवरील वाढते हल्ले ही गंभीर बाब असून, प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूण येथील या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही होत आहे.

