(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरालगतच्या साईनगर परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडल्याची घटना घडली असून, सुदैवाने घरांमध्ये कोणताही मौल्यवान मुद्देमाल नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. नुकतेच शहरातील नाचणे येथील छत्रपतीनगर भागात दोन घरांवरील चोरीनंतर ही दुसरी मोठी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईनगरमधील ही तिन्ही घरे अनेक दिवसांपासून बंद होती. बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या घरांची कुलूपे तोडून आत प्रवेश केला. घरांमध्ये मौल्यवान वस्तू नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पसार होणेच पसंत केले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्यांविषयी संताप आणि असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, दिवाळीपूर्वीच शहर व परिसरात चोरट्यांनी डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. नाचणे व साईनगर या दोन्ही भागांत अल्पावधीत झालेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

