(रत्नागिरी)
दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न आणि व्यायामाकडे वाढती दुर्लक्ष या दोन्ही गोष्टी मानवी आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यजागृतीसाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिंगला दिले जाणारे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरत आहे. देशभरातील विविध सायकलिंग क्लब लांब पल्ल्याच्या सायकलिंगला चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.
अशाच प्रेरणादायी कामगिरीत चिपळूणचे मनोज भाटवडेकर आणि कराडचे रविराज जाधव यांनी कराड- सोलापूर हा तब्बल 600 किलोमीटरचा प्रवास सलग 39 तास 42 मिनिटांत पूर्ण करत उल्लेखनीय पराक्रम साधला. या दोघांनी प्रतिष्ठित ऑडेक्स क्लब पॅरेशियन (पॅरिस) तर्फे दिला जाणारा ‘सुपर रॅन्डोनिअर’ हा मानाचा किताब मिळवला आहे. विशेष म्हणजे मनोज भाटवडेकर यांनी सलग पाचव्यांदा हा किताब पटकावून कोकणातील पहिल्याच सायकलिस्ट म्हणून नवा इतिहास रचला आहे.
जागतिक स्तरावर, कोणाचीही मदत न घेता एका वर्षात 200, 300, 400 आणि 600 किमी असे एकूण 1500 किमी बीआरएम निर्धारित वेळेत पूर्ण करणाऱ्या सायकलपटूला ‘सुपर रॅन्डोनिअर’ हा किताब मिळतो. जगभरातील ऑडेक्स क्लब पॅरेशियनशी संलग्न क्लब हे बीआरएम कार्यक्रम आयोजित करतात. चिपळूणचा सह्याद्री रॅन्डोनिअर्स हा असाच अग्रगण्य क्लब असून त्याच्याच माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील 70 हून अधिक सायकलिस्ट एसआर झाले आहेत.
15 नोव्हेंबर रोजी पहाटे कराड येथील शिवतीर्थ परिसरातून या 600 किमी बीआरएमला प्रारंभ झाला. कराड–सातारा–लोणंद–फलटण–नातेपुते–पंढरपूर–सोलापूर–रिटर्न असा हा कष्टसाध्य मार्ग होता. मात्र पहिल्या 70 किलोमीटरमध्येच मनोज भाटवडेकर यांच्या जुन्या पायाच्या दुखापतीने त्रास द्यायला सुरुवात केली. तरीही जिद्द, चिकाटी आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने दोघांनीही कठोर उन्हात आणि रात्रभर सलग सायकलिंग करत लक्ष्य गाठले.
रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास त्यांनी कराडमध्ये पुनश्च आगमन करून 600 किमीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला. दुखापतीवर मात करून मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी आहे. सह्याद्री रॅन्डोनिअर्स व चिपळूण सायकल क्लबच्या सदस्यांच्या सहकार्याने हे यश शक्य झाल्याची भावना मनोज भाटवडेकर यांनी व्यक्त केली.
सन 2021 साली मनोज भाटवडेकर यांनी पहिल्यांदा सुपर रॅन्डोनिअर हा किताब पटकाविला होता. त्यानंतर सन 2022 -2023 साली दुसर्यांदा त्यांनी हा किताब पटकाविला आहे. सन 2023 – 2024 साली दोनवेळा त्यांनी हा किताब पटकाविला होता. त्यानंतर सन 2025 साली नोव्हेंबरपूर्वी त्यांनी 200,300 आणि 400 किलोमीटर बीआरएम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केल्या होत्या. त्यामुळेच आता 600 किलोमीटर अंतर यशस्वीपणे पार करत त्यांनी पाचव्यांदा एसआर हा बहुमान मिळविला आहे.

