(रायगड)
खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीतील ‘लाईफ अँड जॉय’ रिसॉर्टमध्ये नुकतीच नोकरी सुरू केलेल्या 23 वर्षीय तरुणाचा मंगळवारी (दि. 12 ऑगस्ट) सकाळी कलोते धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव अभय शिवाजी राऊत (वय 23, रा. माजलगाव, जि. बीड) असे आहे.
अभय राऊतने केवळ चार दिवसांपूर्वीच ‘लाईफ अँड जॉय’ या धरणकाठच्या रिसॉर्टमध्ये काम सुरू केलं होतं. सकाळच्या सुमारास तो जीन्स आणि टी-शर्ट घालूनच पाण्यात पोहण्यासाठी उतरला. सुरुवातीला काही अंतर पोहून गेला, मात्र पाण्याची खोली आणि थकवा यामुळे त्याची शक्ती क्षीण झाली व तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ‘हेल्प फाउंडेशन’ (खोपोली)च्या पथकाला पाचारण करून शोधकार्य सुरू करण्यात आलं. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अभय राऊत याचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

