(बंगळुरू /नाशिक |प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या पावन उपस्थितीत बंगळुरू येथे सेवामार्गाचा देश- विदेश अभियान विभाग व स्थानिक सेवेकरी यांच्यावतीने श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन, माता सरस्वती पूजन आणि घोरकष्टोधारक पादुका पूजनाचा कार्यक्रम अत्यंत चैतन्यदायी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने गुरुपुत्र श्री. मोरे यांचा सत्संग संपन्न झाला.सेवेकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी सेवामार्ग उभारणीसाठी सद्गुरु पिटले महाराज व सद्गुरु मोरेदादा यांचे महत्त्वपूर्ण योगदान स्पष्ट केले. परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या कार्याची माहिती देताना अल्पकाळात गुरुमाऊलींनी सेवामार्ग वैश्विक स्तरावर कशा पद्धतीने पोहोचविला तसेच विश्वशांती आणि राष्ट्र व समाज कल्याणासाठी विविध सेवांचे वेगवेगळे प्रयोग कशा पद्धतीने यशस्वी केले त्याबाबत विस्तृतपणे सांगितले.
अध्यात्मात पादुका पूजनाचे अनन्यसाधारण महत्त्व..
अध्यात्मात पादुका पूजनाचे महत्त्व स्पष्ट करताना गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे म्हणाले की,सर्व देवी- देवतांनी आपले अवतार संपविताना मागे काही ठेवले नाही, मात्र दत्तगुरूंच्या निरनिराळ्या अवतारांनी भक्तांच्या कल्याणासाठी अवतार समाप्तीनंतरही आपल्या मागे सर्वोच्च शक्तिशाली पादुका ठेवल्या.आज सर्वच दत्तस्थानांवर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या पादुकांचे विशेष महत्त्व आहे. कारण पादुकांमध्ये चैतन्यदायी शक्ती असते. त्यामुळे सेवामार्गाच्या मूल्यसंस्कार विभागातर्फेही आई-वडिलांच्या चरणांवर डोके टेकवून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार बालकांवर रुजविले जातात ते याच कारणासाठी! कारण आई-वडिलांची सकारात्मक ऊर्जा चरणांमधून प्रवाहित होते आणि तीच ऊर्जा डोके टेकविणाऱ्या बालकाच्या भ्रुमध्यातून त्याच्या शरीरात प्रवेश करते. हे वैज्ञानिक सत्य आहे हे रहस्यही त्यांनी उलगडून दाखविले. मुलांना उच्च शिक्षित करताना मूल्यसंस्काराची बीजेही त्यांच्या कोवळ्या मनावर रुजविणे काळाची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.
सेवा झाल्या आणि बंगळुरूत पाऊस बरसला..
गुरुपुत्र श्री. मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माता सरस्वती पूजनाची सेवा घेण्यात आली. त्यानंतर समाज कल्याणासाठी घोरकष्टोधारक पादुका पूजन आणि चक्रराज श्रीयंत्र पूजनाची सर्वोच्च सेवा संपन्न झाली. सुमारे पंधराशे सेवेकर्यांनी विविध सेवांमध्ये अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. या सर्व सेवा पूर्ण झाल्यानंतर बंगळूरूमध्ये काही दिवसांपासून पाठ फिरणाऱ्या पावसाने धुवाधार बरसायला सुरुवात केली आणि सारे सेवेकरी सुखावून गेले. गुरुपुत्र श्री मोरे यांनी या तीनही सेवांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. सेवामार्गाचे ज्येष्ठ याज्ञिकी श्री दीपकशास्त्री मुळे यांनी पौरोहित्य केले. स्थानिक सेवेकऱ्यांच्या मागणीनुसार हाच कार्यक्रम यावर्षी १४ डिसेंबर रोजी पुन्हा घेण्याचे जाहीर करण्यात आले, तेव्हा सेवेकर्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.