(मुंबई)
मुंबईच्या भांडुप पश्चिम परिसरात सोमवारी (29 डिसेंबर) रात्री बेस्ट बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. भांडुप स्टेशन रोड परिसरात बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेत किमान 4 जणांचा मृत्यू, तर 10 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हा अपघात रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडला. बेस्टच्या MH 01, CV 6515 या क्रमांकाच्या इलेक्ट्रीक बसने यावेळी अनेक प्रवाशांना चिरडले आहे. बस अचानक मागे येत असल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवासी आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक बसली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बेस्टचे वरिष्ठ अधिकारी आणि 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एक महिला आणि आठ पुरुष असल्याचं समोर आलं आहे. अपघातप्रकरणी बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की अपघाताच्या वेळी परिसरात मोठी गर्दी होती, त्यामुळे मृत आणि जखमींचा आकडा आणखी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

